वारणानगर / प्रतिनिधी
उमेदवारीची कोंडी फुटल्याने खासदार संजय मंडलिक,खासदार धैर्यशील माने यांनी आज मंगळवार दि.२ रोजी वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेत आभार मानले. यावेळी येणाऱ्या निवडणूकीत कराव्या लागणाऱ्या रणनितीवर या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
शिवसेनेत उभी फूट पडल्यावर कोल्हापूरातील शिवसेनेचे खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने हे दोन्ही खासदार काही दिवस उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून भाजपा सरकारला पाठींबा द्यावा यासाठी आमदार डॉ.विनय कोरे यांनी पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावली होती अशी त्यावेळी राजकीय वर्तूळात चर्चा होती. त्यामुळे आपल्या शब्दावर शिंदे गटात प्रवेश केला आता उमेदवारी देखील तुम्हीच निश्चित करा असाच काहीसा सूर आमदार कोरे यांच्या भेटीत यापूर्वी उमटल्याची चर्चा झाली होती.
कोल्हापूरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटासोबत सूर जुळवल्याने नैसर्गिक न्यायाने शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता खरीच ठरली.
शिंदे गटाच्या कोट्यातील एक जागा भाजपाला मिळावी या साठी जनतेतील केलेल्या सर्व्हेचे कारण पुढे करून भाजपाने या विद्यमान दोन्ही खासदारांना शिंदे गटातून उमेदवारी देण्यास आडकाठी निर्माण केली होती तीदूर करण्यास आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्वाची ठरल्याने त्यांचे आज आभार मानले.
भाजपा सोबत आ. विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष आहे तथापी तो पक्ष लोकसभा निवडणुक लढवणार नाही त्यामुळे आ. विनय कोरे यांनी महायुती जो उमेदवार उभा करेल त्यांच्या विजयासाठी आमचा पक्ष काम करेल असे आ. कोरे यांनी यापूर्वीच भूमिका जाहिर केली होती शिवसेना शिंदे गटाने खा. मंडलिक व खा. माने यांना उमेदवारी जाहिर केल्याने हे दोन्ही खासदार आज वारणानगर येथे भेटले.
निवडणूकीत अर्ज भरण्यापूर्वी व अर्ज भरल्यानंतर राबवण्यात येणारी प्रचार यंत्रणा, सभा, गाठी भेटी, पदयात्रा याबाबत चर्चा यावेळी झाल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.