भाजप उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन
पणजी : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी 20 वर्षांनंतर प्रथमच मडकई मतदारसंघात प्रचारसभा घेतली व ती देखील भाजपच्या उमेदवारासाठी. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या स्वत:साठी कधीही मडकईत जाहीर प्रचारसभा घेतल्या नाहीत. ढवळीकर म्हणाले, आजवर अनेक वेळा लोकसभा निवडणुकीत आपण भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ काम केले, त्यांना बहुमत मिळवून दिले. परंतु कधीही जाहीर सभा या मतदारसंघात घेतली नाही. प्रथमच भाजपच्या आग्रहाखातर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार ढवळी येथे मंगळवारी जाहीर सभा घेतली. या सभेला स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उमेदवार पल्लवी धेंपे, प्रदेश भाजप अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे आणि मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर हे उपस्थित होते. आपल्या मतदारसंघातील जनता भाजपच्या पाठिशी आहे आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते भाजपलाच मिळवून देण्यासाठी मगो पक्ष आणि येथील मतदार प्रयत्न करणार आहेत. आमच्या मतदारसंघात सभा घेण्याचीही मुळीच गरज नाही, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजप उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू असे आश्वासन मंत्री ढवळीकर यांनी दिले.