वेतनात वाढ, कामगारांना दिलासा
बेळगाव : अकुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या रोहयो मजुरांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 316 रुपयांवरून 349 रुपये मजुरी झाली आहे. येत्या 1 एप्रिलपासून हे नवीन वेतन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारांना आता जादा वेतन मिळणार आहे. यामुळे रोहयो कामगारातून दिलासा व्यक्त होऊ लागला आहे. जिल्ह्यात रोहयो कामगारांची संख्या मोठी आहे. अलीकडे त्यामध्ये नवीन कामगारांची भर देखील पडली आहे. दरम्यान, प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. या योजनेमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळत आहे. केंद्र सरकारने 2005 पासून ही योजना सक्रिय केली आहे. त्यामुळे गोरगरीब ग्रामीण भागातील रोहयोंना आर्थिक पाठबळ मिळू लागले आहे. कोरोनाकाळात रोहयोंच्या मजुरीत थोडी वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा 33 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मजुरी 349 रुपयांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यातील रोहयो कामगारांच्या मजुरीत वाढ केली आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील रोहयो कामगारांची मजुरी 33 रुपयांनी वाढविली आहे. रोहयो अंतर्गत तलाव, गटारी, स्वच्छता, रस्ते आणि इतर ठिकाणी काम केले जात आहे. या योजनेमुळे अनेक तलावांना पुनरुज्जीवन मिळाले आहे. त्याचबरोबर नवीन नाल्यांची निर्मितीदेखील केली जात आहे. नद्यांची दुरुस्ती व स्वच्छतेचे कामदेखील याअंतर्गत हाती घेतले जात आहे. त्यामुळे जलस्रोतांना नवसंजीवनी मिळू लागली आहे. त्याचबरोबर संपर्क रस्ते आणि शेतशिवारातील रस्तेदेखील रोजगारांतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ लागला आहे. शिवाय स्थानिक पातळीवर रोजगारांच्या हाताला कामदेखील मिळू लागले आहे. त्यामुळे या योजनेला महिला कामगारांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. आता मजुरीत वाढ करण्यात आल्याने पुन्हा या योजनेकडे कामगारांचा प्रतिसाद वाढणार आहे.









