वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर असलेले आपले संबंध तोडले असून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या चर्चेनंतर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आजचा म्हणजे 27 मार्चचा अल्टिमेटम दिला होता.
काल प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांची भेट झाली. या भेटीत दोघांनी राजकिय आघाडीबाबत चर्चा केली. मराठा आंदोलनाची दिशा आणि राजभरात लोकसभेसाठी देण्यात येणारी उमेदवारीवरूनही चर्चा झाली.
दरम्यान, आज सकाळी मुंबईमध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडी अघाडीबरोबर असलेले आपले संबंध तोडत असल्याचं जाहीर करताना ते म्हणाले, “एमव्हीए आघाडीत मनोज जरंगे- पाटील या घटकाचा विचार करण्यात यावा यासाठी मी प्रस्ताव ठेवला होता. पण या विषयावर महाविकास आघाडी चर्चा करण्यास तयार नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर केला.”
घराणेशाहीसाठी वंचितचा वापर…
पुढे महाविकास आघाडीवर टोकदार निशाणा साधताना त्यांनी “मविआच्या आपल्या घराणेशाहीच्या राजकारणाला संरक्षण हवे होते. त्या संरक्षणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना वंचित बहूजन आघाडीचा वापर करून घ्यायचा होता,” असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपाने जैन, मुस्लिमांना बाजूला सारले….
पुढे बोलताना त्यांनी “भाजपाने मुस्लीमांना बाजूला टाकण्याचं राजकारण सुरू केले असून त्या समाजालाहीउमेदवारी देण्याचे आम्ही ठरविले. तसेच जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मराठा, मुस्लीम आणि गरीब ओबीसी यांची सांगड घालून आम्ही नवी वाटचाल करत आहोत” असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अकोल्यातून प्रकाश आंबेडकर…
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांनी अकोल्यामधून आपण स्वत: लढणार असल्याचं जाहीर केलं. त्याच प्रमाणे भंडारा- गोंदिया मतदारसंघातून संजय गजानन केवट, गडचिरोली-चिमूर मधून हितेश पांडुरंग मढावी, चंद्रपूरमधून राजेश बेले, बुलढाणामधून वसंत मगर, अमरावतीमतदारसंघातून प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा या मतदारसंघातून प्रा. राजेंद्र साळुंखे, यवतमाळ-वाशिमसाठी खेमसिंग प्रतापराव पवार यांची नावे जाहीर केली गेली.