वृत्तसंस्था /बेंगळूर
येथे झालेल्या तिसऱ्या इंडिया खुल्या उडी स्पर्धेत केरळची महिला अॅथलिट्स नयना जेम्सने दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. केरळच्या नयनाची या क्रीडा प्रकारातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. केरळच्या 28 वर्षीय नयना जेम्सने महिलांच्या लांब उडीत 6.67 मीटरचे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात नयनाने अनुभवी शैली सिंगला मागे टाकले. शैली सिंगने 6.40 मीटरचे अंतर नोंदवित रौप्यपदक घेतले. उत्तर प्रदेशच्या शैली आणि नयना जेम्स यांच्यातच सुवर्णपदकासाठी सुवर्णपदकासाठी खरी चुरस लागली होती. पुरुषांच्या लांब उडीमध्ये केरळच्या मोहमद अनीसने 7.95 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तामिळनाडूच्या 22 वर्षीय पवित्रा वेंकटेशने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना 4.15 मी. चे अंतर नोंदवले. तामिळनाडूच्या एम. गौतमने पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये 5.10 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या तिहेरी उडीत अब्दुल्ला अब्बूबाकरने 16.76 मीटरचे अंतर नोंदवित सुवर्णपदक तर इ. पॉलने 16.45 मीटरचे अंतर नोंदवित रौप्य तर तामिळनाडूच्या सेल्वा प्रभूने 16.32 मीटरचे अंतर नोंदवित कास्यपदक घेतले.









