पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन : दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्ष विजयी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांच्या संघटित प्रयत्नांची नितांत गरज आहे. या निवडणुकीत विजयी पताका फडकविली पाहिजे, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. शहरातील जिवेश्वर भवन येथे आयोजित केलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. राज्यामध्ये काँग्रेसचे वारे वाहत आहेत. काँग्रेस पक्षाला का विजयी करावे, म्हणजे बोले तैसा चाले, दिलेले वचन पाळलेले आहे. गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी नागरिकांना पक्षाच्या योजना व त्याची माहिती करून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकर्त्यांनी पक्षाचे बळ वाढविण्याची गरज
बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस पक्षाची शक्ती कमी आहे. यासाठीच प्रत्येक निवडणुकीत या मतदार संघात प्रचारासाठी अद्य क्रम दिला जातो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे बळ वाढविले पाहिजे. दक्षिण मतदार संघात 50 ते 60 हजार लीड दिल्यास काँग्रेसचा ध्वज फडकवू शकतो, हे निश्चित आहे. कोणतीही निवडणूक असली तरी विजयासाठी सर्वांनी एकत्रित येवून काम केले पाहिजे, एकता राखली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोणालाही उमेदवारी दिल्यास पक्षाच्या विजयासाठी परिश्रम घ्या
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, गेल्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला 136 जागा जिंकता आल्या आहेत. यामुळे देशभरात आनंद व्यक्त केला होता. बेळगाव, चिकोडी लोकसभा मतदार संघातून पक्षाकडून कोणालाही उमेदवारी देण्यात आल्यास त्यांच्या विजयासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे
आमदार राजू सेठ म्हणाले, सर्वांनी एकता ठेवून, एकत्रित येवून निवडणुकीत परिश्रम घेतल्यास विजय निश्चित आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मृणाल हेब्बाळकर, केपीसीसी प्रधान कार्यदर्शी सुनील हणमन्नावर, बेळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., परशुराम ढगे, लिंगराज कदम, राजू कौजलगी आदी उपस्थित होते.









