वृत्तसंस्था/ बॅसेल. स्वित्झर्लंड
माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांत व फॉर्ममध्ये असलेला लक्ष्य सेन यांनी येथे सुरू झालेल्या स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करीत एकेरीची दुसरी फेरी गाठली.
माजी अग्रमानांकित के. श्रीकांतने ही स्पर्धा 2015 मध्ये जिंकली होती. त्याने चिनी तैपेईच्या 24 व्या मानांकित वांग त्झू वेइ याचा 21-17, 21-18 अससा केवळ 43 मिनिटात पराभव केला. या दोघांत आतापर्यंत सातवेळा गाठ पडली असून श्रीकांतचा हा त्यातील सहावा विजय आहे. लक्ष्य सेनने मलेशियाच्या लिआँग जुन हाओवर 21-19, 15-21, 21-11 अशी 62 मिनिटांच्या खेळात मात केली. त्याची पुढील लढत चिनी तैपेईच्या चिआ हाओ ली याच्याशी होणार आहे तर श्रीकांतची लढत मलेशियाचा अग्रमानांकित ली झी जियाशी होईल.
महिला दुहेरीत सहाव्या मानांकित तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांनी इंडोनेशियाच्या मेलीसा ट्रायस पुस्पितासरी व रॅचेल अॅलेसीया रोज यांचा 21-18, 12-21, 21-19 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. जपानच्या रुइ हिरोकामी व युना काटो यांच्याशी त्यांची पुढील लढत होईल. अन्य एक भारतीय जोडी के. प्रिया व श्रुती मिश्रा यांनी चिनी तैपेईच्या हुआंग युसुन लियांग टिंग यु यांच्यावर 21-13, 21-19 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही याआधीच दुसरी फेरी गाठली आहे.









