वृत्तसंस्था/ बेंगळूर
किंग या नावाने आपल्याला संबोधले जाऊ नये, असे आवाहन आरसीबीच्या विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना केली आहे. या संबोधण्याने संकोचल्यासारखे वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे.
बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले त्याप्रसंगी विराटने चाहत्यांना वरील आवाहन केले. या कार्यक्रमावेळी आरसीबीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे नवे नामकरण करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांना उद्देशून बोलताना कोहलीने किंग हा शब्द यापुढे न वापरण्याची विनंती केली. ‘मला किंग म्हणणे आधी थांबवा, मला फक्त विराट म्हणा. मला त्या संबोधनाने संकोच वाटत असल्याचे मी नुकताच फॅफ डु प्लेसिसशी बोलताना सांगितले. यापुढे कृपया त्या संबोधनाने माझा उल्लेख करणे पूर्णपणे टाळावे,’ असेही त्याने सांगितले.
22 मार्च रोजी आयपीएलची सुरुवात होत असून पहिलाच सामना आरसीबी व विद्यमान विजेते चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून आरसीबीला एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही तर चेन्नईने पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.









