शिवहरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची अटकळ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे शक्तिशाली नेते आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद यांनी आपल्या समर्थकांसह जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांचा मुलगा अंशुमन आनंदही जेडीयूमध्ये दाखल झाला. राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पक्ष जी काही जबाबदारी देईल ती मी पार पाडेन, असे लवली आनंद यांनी संगितले. लवली आनंद जेडीयूच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवू शकतात. त्यांना शिवहरमधून उमेदवारी मिळू शकते. त्या राजपूत समुदायाच्या असून त्यांचे पतीही खासदार राहिले आहेत.
बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. बिहारमधील एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत करार झाला आहे. पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, अजियारपूर, बेगुसराय, नवादा, पाटणा साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर आणि सासाराममधून भाजपचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. वाल्मिकीनगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शिवहर येथून जेडीयू उमेदवार रिंगणात असतील. चिराग पासवान यांच्या पक्षाला वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या जागा मिळाल्या आहेत, तर ‘हम’ गया आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे उमेदवार करकटमधून निवडणूक लढवणार आहेत.









