अफगाणिस्तानातील महिलांची परिस्थिती बिघडल्याने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा पवित्रा
वृत्तसंस्था/ सिडनी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या बाबतीत परिस्थिती बिघडत चालली असल्याचे कारण देत या वर्षी ऑगस्टमध्ये ठेवलेली अफगाणिस्तानच्या पुऊष संघाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका पुढे ढकलली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानात सत्तेवर परतल्यानंतर मुलींनी शाळेत जाण्यावर निर्बंध लादले आहेत, महिलांना विद्यापीठांमध्ये जाण्यास प्रतिबंध केला आहे आणि महिला मदत कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखले आहे. आगामी मालिका पुढे ढकलण्याचा ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा निर्णय हा दक्षिण आशियाई देशांबाबतच्या त्यांच्या कठोर भूमिकेस धरून आहे. यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर, 2021 मध्ये होबार्टमध्ये होणार असलेली अफगाणिस्तानविऊद्धची एकमेव कसोटी रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये ठेवलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलली होती.
गेल्या बारा महिन्यांत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारशी सल्लामसलत करणे चालू ठेवलेले आहे. सरकारच्या मते, अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. या कारणास्तव आम्ही आमचा पूर्वीचा पवित्रा कायम ठेवला असून अफगाणिस्तानविऊद्धची द्विपक्षीय मालिका पुढे ढकलत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत न उतरलेला अफगाणिस्तान हा एकमेव पूर्ण सदस्य होता. याचे कारण त्या देशात महिलांना क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने सप्टेंबर, 2021 मध्ये सदर संघर्षग्रस्त देशाचा ताबा घेतल्यापासून आणि महिलांच्या खेळातील सहभागावर निर्बंध घातल्यापासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानशी खेळण्यास नकार देण्याची ही तिसरी वेळ आहे.









