वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना)
अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीला स्नायू दुखापत झाल्याने तो चालू महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत होणाऱ्या दोन मित्रत्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती अर्जेंटिना फुटबॉल संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
काँकेफ चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धेतील गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात इंटर मियामी संघाकडून खेळताना 36 वर्षीय मेस्सीला ही स्नायू दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या पायाचा स्नायू दुखावल्याने त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान अर्जेंटिना संघाचे दोन मित्रत्वाचे सामने अमेरिकेत आयोजित केले आहेत. अर्जेंटिना आणि एल साल्वादोर यांच्यातील सामना येत्या शुक्रवारी फिलाडेलफिया येथे तर दुसरा मित्रत्वाचा सामना लॉस एंजेलस येथे पुढील मंगळवारी कोस्टा रिकाबरोबर होणार आहे. अर्जेंटिना संघासाठी हे दोन्ही सामने आगामी म्हणजे येत्या जून-जुलै दरम्यान होणाऱ्या कोपा अमेरिका चषक स्पर्धा पूर्वीचे सरावाचे सामने आहेत.









