वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या ससेक्स संघामध्ये भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेतील ससेक्सच्या शेवटच्या 5 सामन्यात उनादकट खेळणार आहे.
गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात 32 वर्षीय उनादकटने 4 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याने इंग्लिश काऊंटी क्रिकेट स्पर्धेतील ससेक्स संघाकडून शेवटच्या चार पैकी तीन सामन्यात खेळ केला होता. या तीन सामन्यांमध्ये त्याने 24.18 धावांच्या सरासरीने 11 गडी बाद केले. उनादकटच्या या कामगिरीमुळे ससेक्स संघाने डिव्हिजन दोनमध्ये तिसरे स्थान मिळविले होते. 2023 साली उनादकटने विंडीजमध्ये दोन कसोटी सामने खेळले होते. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने लिसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करताना दुसऱ्या डावात 6 बळी मिळविल्याने ससेक्सने हा सामना 15 धावांनी जिंकला होता. 2019-20 च्या क्रिकेट हंगामात पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकणाऱ्या सौराष्ट्र संघाचे नेतृत्व उनादकटने केले होते. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जयदेव उनादकट सनरायझर्स हैदाराबाद संघाचे प्रतिनिधित्व करेल.