मातब्बर नेत्याने सोडला पक्ष
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या बारपेटाचे काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अब्दुल खालिक यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सचिवाच्या विरोधात तक्रारही केला आहे. दोनवेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या खालिक यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. काँग्रेसने बारपेटा मतदारसंघात दीप बायन यांना उमेदवारी दिली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभारी महासचिव यांचे वर्तन अणि दृष्टीकोनामुळे आसाममध्ये पक्षाची अधोगती होत असल्याचे खालिक यांनी स्वत:च्या पत्रात नमूद केले आहे. काँग्रेस यावेळी आसाममधील 14 पैकी 13 जागा लढवत आहे. तर एक जागा आसाम जातीय परिषद या घटक पक्षासाठी सोडण्यात आली आहे.
काँग्रेसचा सदस्य म्हणून मागील 25 वर्षांपासून मी कार्यरत राहिलो आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काम करत असताना पक्षाच्या विचारसरणीमुळे मी राजकारणाकडे आकर्षित झालो होतो. परंतु आता काँग्रेसमध्ये वेगळेच चित्र दिसून येत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकांमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि एकतेची दृढ भावना असणे आवश्यक आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी महासचिवांच्या कार्यपद्धतीमुळे आसाममध्ये पक्षाला फटका बसत आहे. काँग्रेसकडून लोकांचे मुद्दे उपस्थित केले जाण्याऐवजी भलत्याच गोष्टी केल्या जात आहेत असा दावा खालिक यांनी केला. आसाममध्ये सध्या काँग्रेसचे तीन खासदार आहेत.









