बेकिनकेरेत भरदिवसा गव्यांचा धुमाकूळ : नागरिकांत खळबळ, बंदोबस्ताची मागणी
बेळगाव : बेकिनकेरे गावात गुरुवारी दोन गव्यांनी भरदिवसा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती गेला अन् गव्यांचा कळप आला. त्यामुळे परिसरात वन्यप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे. गावात आलेल्या गव्यांनी गावाशेजारी असलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. शिवाय आता वन्यप्राण्यांमुळे घराबाहेर पडणेच धोकादायक बनू लागले आहे. याबाबत वनखाते कितपत गांभीर्य घेणार, असा प्रश्नही पडला आहे. गुरुवारी सकाळी 8 च्या दरम्यान दोन गवे शेताकडे जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडले. दरम्यान नागरिकांच्या गोंधळामुळे गवे बिथरले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहनही ग्रामपंचायतीने केले आहे. डोंगर परिसरातून वन्यप्राणी खाली येऊ लागले आहेत. वन्यप्राण्यांची मजल आता मानवी वस्तीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. गावाशेजारी आलेल्या गव्यांमुळे एकच खळबळ मजली आहे. मागील 15 दिवसांत हत्तींनी धुमाकुळ घातला होता. आता गवे आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. यंदा पावसाअभावी डोंगर परिसरात वन्यप्राण्यांना चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वन्यप्राणी भरवस्तीत येऊ लागले आहेत. सैरभैर झालेल्या दोन गव्यांनी बेकिनकेरेत सकाळी चांगलाच धुमाकूळ घातला. गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र ग्राम पंचायतीने गव्यांपासून लांब रहावे, असे आवाहन केले. सीमाहद्दीवर असलेल्या बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड आणि चंदगड तालुक्यातील कौलगे-होसूर, सुंडी परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करू लागले आहेत. आता तर चक्क वन्यप्राणी भरदिवसा गावात शिरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होवू लागली आहे. गावात आलेल्या दोन गव्यांमुळे चिंता वाढली आहे. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे
गुऊवारी सकाळी बेकिनकेरे गावात आलेले गवे गावा शेजारी असलेल्या नाल्याजवळच आहेत की डोंगर परिसरात निघून गेलेत याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. गावाच्या आसपास परिसरातील शेतात असलेल्या जोंधळा आणि इतर पिकांमध्ये गव्यांनी हैदोस घातला आहे. गवे अद्याप त्याच ठिकाणी असावेत, असा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गव्यांचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा
गावाशेजारी गुऊवारी सकाळी 8 च्या दरम्यान दोन गवे दृष्टीस पडले आहेत. दुपारपर्यंत हे गवे गावा शेजारीच असलेल्या नाल्याजवळ होते. चारा, पाण्याच्या शोधात हे गवे आले असावेत. वन खात्याने यांचा बंदोबस्त करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा.
-नागेंद्र धायगोंडे, ग्रामस्थ