वाहनधारकांचे हाल : ठिकठिकाणी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य : दररोज अपघातांची मालिका सुरूच, रस्ताकाम पूर्ण होण्याबाबत साशंकता
वार्ताहर /रामनगर
खानापूरपासून अनमोडपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्याचे टेंडर संपत आले तरी काम अजूनही अर्धवट स्थितीतच आहे. या मार्गाचे काम 22 मे पर्यंत पूर्ण करून देण्याचा करारही ठेकेदाराने केला आहे. परंतु अजूनही सदर मार्गावरील मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असून सध्यातरी रामनगरपासून अनमोडपर्यंतच्या महामार्गाचे काम बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावर फक्त धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजूनही किती वर्षांचा कालावधी लागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. सदर काम कासवगतीने सुरू असल्याने सध्याच्या ठेकेदाराला पेनल्टी सुरू असून 22 मे पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण न केल्यास दुसरा टेंडर घालण्यात येणार असल्याचेही यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सध्या अनमोडमार्ग बंद करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव नसून विनाकारण महामार्ग वाहतुकीला बंद असल्याच्या अफवा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
किमान रस्त्यावर पाणी तरी मारा!
सध्या रामनगरपासून अनमोडमार्गाचे काम बंद असल्याने रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या मार्गावर दुचाकीधारकांचे अपघात मात्र मोठ्या प्रमाणात होत आहेत. सोमवारी रात्री गोवा येथून गदगला दुचाकीवरून जाणारा इसम रामनगरनजीक असणाऱ्या अस्तुली ब्रिजवर धुळीमुळे समोरील रस्ता न दिसल्याने पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला बेळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. असे वारंवार अपघात होत असल्याने या मार्गावर रस्ता वाटल्यास करू नका किमान रस्त्यावर पाणी तरी मारा असे म्हणण्याची वेळ आता दुचाकीधारकांवर आली आहे.
वाहतूक कोंडीमुळे तासन्तास ताटकळत
रस्ताकाम तातडीने व्हावे या दृष्टिकोनातून अवजड वाहनांसाठी अनमोड घाटातून सायंकाळी सात ते सकाळी सहा पर्यंत वेळापत्रक देण्यात आले आहे. परंतु सदर वेळापत्रकामुळे रात्रीच्या वेळी घाटमाथ्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. आता लोकसभा निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू होत असल्याने अनमोड अबकारी चेक नाका येथे कसून तपासणी करण्यास सुरुवात होते. परंतु या ठिकाणी सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्यानंतर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. येथे नेमलेल्या अधिकाऱ्यांना वाहन तपासणी करणेही मुश्कील होणार आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत तरी सर्व वाहनांना 24 तास सोडणे गरजेचे आहे.
अपघातांची मालिका सुरूच
बुधवारी सायंकाळी गोवा येथून रामनगर यात्रेसाठी स्टॉल घालण्यासाठी येणाऱ्या दुचाकीस्वाराला ब्रिजवरील मधोमध काढण्यात आलेला ख•ा धुळीमुळे न दिसल्याने तो अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णवाहिकेतून रामनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.









