वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली कॅपिटल्स संघातील इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने काही कौटुंबिक समस्येमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यात हॅरी ब्रुकच्या आजीचे निधन झाले होते. दरम्यान ब्रुकने आपल्या कुटुंबीय सदस्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी 25 वर्षीय हॅरी ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते. गेल्या वर्षी ब्रुकने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण केले होते. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या संघात 55 चेंडूत शतक झळकवले होते. यापूर्वी हॅरी ब्रुकने सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून 11 सामन्यातून 190 धवा जमवल्या होत्या. हैद्राबाद संघाने त्याला 13.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. त्यानंतर 2024 च्या आयपीएलसाठी झालेल्या क्रिकेटपटूंच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रांचायझीनी 4 कोटी रुपयांच्या बोलीवर ब्रुकला करारबद्ध केले होते. दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना 23 मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाबरोबर होणार आहे.









