वृत्तसंस्था /सिंगापूर
येथे सुरू असलेल्या सिंगापूर स्मॅश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात भारताचा अनुभवी आणि वयस्कर टेनिसपटू शरथ कमलने इजिप्तच्या 22 व्या मानांकित ओमर असारला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 1.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत शरथ कमलने असारचा 11-4, 11-8, 12-10 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत शरथ कमलने यापूर्वीच्या फेरीतील सामन्यात स्लोव्हेनियाच्या 13 व्या मानांकित डार्को जॉर्जिकचा पराभव केला होता. शरथ कमलने पहिल्या फेरीच्या लढतीत चिलीच्या निकोलास बर्गोसवर 11-5, 11-4, 11-6 अशी मात केली होती. या स्पर्धेमध्ये शरथ कमलने आपली विजयी घोडदौड कायम राखली असल्याने त्याला पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. सध्या टेटेच्या मानांकनात हरमित देसाई 64 व्या तर मानव ठक्कर 83 व्या स्थानावर आहे. शरथ या मानांकनात 88 व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताच्या पुरुष आणि महिला टेटे संघाने पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याचा नवा इतिहास घडविला आहे.









