पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रणित कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी पटियालाच्या खासदार प्रणित कौर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता पटियाला मतदारसंघातून भाजप त्यांना लोकसभा निवडणुकीत उभे करू शकते, असे मानले जात आहे. प्रणित कौर या पॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. पंजाबमधील ‘रॉयल सीट’ पटियाला येथून त्या चारवेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. ‘मोदीजींचे कार्य आणि धोरणे पाहून आणि विकसित भारताच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखालीच आपण आपली मुले आणि देश सुरक्षित ठेवू शकतो’ असे त्या म्हणाल्या. प्रणित कौर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, अलीकडेच त्यांची मुलगी जयेंद्र कौर हिने आपली आई लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. पॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रणित कौर आणि त्यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि मुलगी जयेंद्र कौर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.









