अश्लील वेबसीरिज अन् चित्रपट दाखविल्याचा आरोप
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ओटीटीवर अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या अॅप्स, वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्म्सवर भारत सरकारने मोठी कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशाप्रकारच्या 18 ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म्सवर देशात बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्म्सवर सातत्याने अश्लील वेबसीरिज आणि चित्रपट दाखविले जात होते. यासंबंधी या प्लॅटफॉर्म्सना अनेकदा इशारा देण्यात आला होता, परंतु प्लॅटफॉर्म्सकडून कुठलीच सुधारणा न झाल्याने अखेर बंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सातत्याने दिला होता. आता 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित 19 वेबसाइट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलवरही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आयटी अधिनियम समवेत अनेक कायद्यांच्या उल्लंघनाच्या आधारावर करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्म्सवर होस्ट करण्यात आलेल्या कंटेटंचा एक मोठा हिस्सा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद आढळून आला होता. या ओटीटी अॅप्सपैकी एका अॅपला 1 कोटीहून अधिकवेळा डाउनलोड करण्यात आले होते.
बंदी घालण्यात आलेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स
ड्रीम फिल्म्स, वुवी, येस्स्मा, अनकट अ•ा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन एक्स व्हीआयपी, बेशरम्स, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रामूड, न्यूफ्लिक्स, मूडएक्स, मोजफ्लिक्स, हॉट शॉट्स व्हीआयपी, फुगी, चिकुफ्लिक्स, प्राइम प्ले









