अडीच लाखाहून अधिकचे साहित्य जप्त
बेळगाव : हुक्काबारवर बंदी असूनही त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानांवर मंगळवारी रात्री छापे टाकण्यात आले. या कारवाईत अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. टिळकवाडी आरपीडी क्रॉसजवळील गॅलरी स्मोक अँड चॉकलेट या दुकानावर छापा टाकण्यात आला. कोणत्याही परवानगीशिवाय हुक्काबारचे साहित्य विक्री केले जात होते. गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी शेखऱ्याप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव ए. जी., पोलीस उपनिरीक्षक श्रीमती के. व्ही. चंदावरकर आदींनी या कारवाईत भाग घेतला. विविध कंपन्यांचे 126 हुक्का, 51 रोल पेपर, 30 चार्कोल, 120 बांग पाईप, विक्रीसाठी बंदी असलेली देशी-विदेशी सिगारेट पाकिटे, विविध कंपन्यांची तंबाखू पाकिटे, 550 हून अधिक फ्लेवर्स असे 2 लाख 56 हजार 600 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अबुबकर जैनाब सिद्धीक (वय 31) मूळचा राहणार तलपाडी, मंगळूर, सध्या रा. विद्यानगर-अनगोळ, शबाब शकीलअहमद (वय 22) रा. हंपनकट्टे, मंगळूर, सध्या रा. विद्यानगर-अनगोळ यांचे हे दुकान असून या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांची चौकशीही केली आहे. दरम्यान, कोल्हापूर सर्कलजवळील युनिक शॉपमध्येही पोलिसांनी तपासणी केली आहे.









