अंधारातूनच वाहनचालकांचा प्रवास : पथदीप सुरू करण्याची मागणी
बेळगाव : रेल्वे प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे गोगटे सर्कलपासून मराठा मंदिर कॉर्नरपर्यंतचे पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. केवळ अधिवेशन अथवा मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुरू असणारे पथदीप इतरवेळी मात्र बंद ठेवले जात आहेत. उड्डाणपुलावर पथदीप नसल्याने अपघातांची मालिका सुरू असून आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. काही वर्षांपूर्वी नैर्त्रुत्य रेल्वेने गोगटे सर्कलपासून मराठा मंदिर कॉर्नरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम केले. परंतु त्यावर बसविण्यात आलेले पथदीप नेमके कोणाच्या अखत्यारित हा प्रश्न अनुत्तरित आहे. सुरुवातीला काही दिवस रेल्वे प्रशासनाने देखभाल केली. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डकडे ही व्यवस्था दिल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु दोन्ही विभागातील समन्वयाच्या अभावामुळे पथदीप बंद आहेत. केवळ अधिवेशन अथवा मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी रेल्वे उड्डाणपुलावरील पथदीप सुरू ठेवले जातात. कपिलेश्वर व जुना धारवाड रोड उड्डाणपुलावरील पथदीप कायम सुरू असताना केवळ गोगटे उड्डाणपुलावरीलच पथदीप का बंद ठेवले जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही पथदीप सुरू करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वाहन चालक, पादचाऱ्यांची गैरसोय
रात्रीच्यावेळी पथदीप सुरू नसल्याने नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. विशेषत: सायकलस्वार ये-जा करीत असताना वाहनांना दृष्टीस न पडल्याने अपघात होत आहेत. पादचारीही अंधारातूनच वाट काढत असल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे व कॅन्टोन्मेंट बोर्डने समन्वय साधून पथदीप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.









