निवडणुकीपूर्वी एक पक्ष भाजपमध्ये विलीन
वृत्तसंस्था/ चेन्नई
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेतृत्व पूर्ण देशात अन्य पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. दक्षिण भारतात भाजप छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्यावर भर देत आहे. दिग्गज तमिळ अभिनेते आर. सरथ कुमार यांनी स्वत:चा पक्ष अकिला इंडिया समथुवा मक्कल काची (एआयएसएमके) मंगळवारी भाजपमध्ये विलीन केला आहे.
पक्ष कार्यकर्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या उपस्थितीत सरथ कुमार यांनी स्वत:चा पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या एकतेला वाढवत आर्थिक विकासाला चालना देत आहेत. मोदींच्या नेतृत्वात अमली पदार्थांपासून मुक्ती अणि युवांच्या कल्याणासाठी काम केले जात असल्याने देशाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सरथ कुमार यांनी स्वत:चा पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यावर म्हटले आहे.
सरथ कुमार यांनी स्वत:च्या पक्ष कार्यकर्त्यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूच्या सत्तेवर आणण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सरथ कुमार यांना राज्यसभेवर पाठविले होते, परंतु सरथ कुमार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला होता. तर 2007 मध्ये सरथ कुमार यांनी एआयएसएमके या पक्षाची स्थापना केली होती.









