संजीवनी फौंडेशनतर्फे फॅमिली डे उत्साहात
बेळगाव : वृद्धांच्या प्रमाणात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होऊ लागली आहे. एकूण वृद्धांपैकी 40 टक्के वृद्ध विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वृद्धांना आरोग्याच्या सुविधेबरोबर सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. वृद्धांचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जाण्यासाठी नवीन पिढीमध्ये जागृती महत्त्वाची आहे, असे विचार माई हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद हलगेकर यांनी काढले. संजीवनी फौंडेशनतर्फे उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभानिमित्त फॅमिली डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर बिम्सचे डॉ. चंद्रशेखर टी. आर., संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, सीईओ मदन बामणे उपस्थित होते. डॉ. मिलिंद हलगेकर पुढे म्हणाले, लोकांचे शहराकडे स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे वृद्धांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. वृद्धांबाबत जागृती व्हावी, यासाठीच जागतिक वयोवृद्ध दिन साजरा केला जातो. वयोमानानुसार वृद्धांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होतात. स्मरणशक्ती, दृष्टी कमी होऊन हाडेही ठिसूळ होतात. अशा परिस्थितीत वृद्धांना आधाराची गरज असते. आहार, विहार आणि विचारदेखील महत्त्वाचे आहेत. वृद्धापकाळ आनंदाने स्वीकारून मनसोक्त जगा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. आजची पिढी पैशांच्या पाठीमागे पडून नाती-गोती विसरत चालली आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविक करताना संजीवनी फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालण्यात आले. मान्यवरांचा शाल, प्रमाणपत्र, तुळसकट्टा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. चंद्रशेखर टी. आर. व मदन बामणे यांनी मनोगत व्यक्त केले. संजीवनी फौडेशनचे कर्मचारी, वृद्ध उपस्थित होते.