बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्रदर्स एफसीने निपाणी एफसीचा 2-0 असा पराभव करुन लोकमान्य चषक पटकाविला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम तर सर्वाधिक गोल करणारा जयेश सांबरेकर यांना गौरविण्यात आले. स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उद्घाटन लोकमान्य सोसायटीचे डायरेक्टर गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब आदी मान्यवरांच्या निपाणी व ब्रदर्स संघाच्या खेळाडूंची ओळख करुन सामन्याला सुरुवात करण्यात आली. या सामन्यात चौथ्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 12 व्या मिनिटाला ब्रदर्सच्या इखलासहमदने मारलेला फटका निपाणीचा गोलरक्षक ओम कदमने उत्कृष्ट अडविला. 22 व्या मिनिटाला निपाणीच्या ज्ञानेश्वर जाधवने गोल करण्याची संधी वाया दवडली.
28 व्या मिनिटाला ब्रदर्सच्या फईक जलालीच्या पासवर इखलासहमदने बचावफळीला चखवत गोल करत 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला निपाणीच्या ऋषिकेशने गोल करण्याची नामी संधी दवडली. 54 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने चेंडू गोलमुखात मारला होता. पण ब्रदर्सच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. 59 व्या मिनिटाला जयेश सांबरेकरच्या पासवर इखलासहमद दुसरा गोल करुन 2-0 ची आघडी सामन्यात मिळवून दिली. या सामन्यात निपाणी संघाने गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, पंढरी परब, लेस्टर डिसोझा, अलाबक्ष बेपारी, गोपाळ खांडे, रमेश गुर्जर, एस. एस. नरगोडी, अमित पाटील, व्हिक्टर परेरा, नंदू बागी, प्रशांत देवदानम, सतीश वेर्णेकर, जॉर्ज रॉड्रिग्ज, मयूर कदम, आर्यन बल्लाळ आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ब्रदर्स एफसीला व उपविजेत्या निपाणी एफसीला चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा जयेश सांबरेकर (ब्रदर्स), उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम (निपाणी), उत्कृष्ट संघ वायएमसीए यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून थॉमस अॅलेक्स, आकाश अय्यर व अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले.