आतापर्यंत 9 वेळा पॅरोल रजा मंजूर
वृत्तसंस्था/ रोहतक
साध्वी लैंगिक शोषण आणि पत्रकार हत्या प्रकरणात दोषी ठरलेला राम रहीम 50 दिवसांच्या पॅरोलनंतर पुन्हा तुरुंगात परतला आहे. राम रहीम 19 जानेवारीला तुरुंगातून बाहेर आला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी 5 वाजता तो रोहतकच्या सुनारिया तुरुंगात परतला. या काळात हरियाणा पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. कारागृहात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येत होती.
शिक्षा सुनावल्यानंतर चार वर्षांत राम रहीमला 9 वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यावेळी तो 19 जानेवारीला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिरोमणी गुऊद्वारा व्यवस्थापन समितीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात राम रहीमला पॅरोल देण्यास विरोध करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हरियाणाच्या भाजप सरकारला भविष्यात राम रहीमला पॅरोल मंजूर करण्यापूर्वी हायकोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
राम रहीमच्या पॅरोलसंबंधी याचिका दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाने गंभीरपणे घेतले आहे. याप्रकरणी हरियाणा सरकारला धारेवर धरताना काही मुद्यांवर स्पष्टीकरणही मागितले आहे. राम रहीमप्रमाणे पॅरोल मिळालेले आणखी किती लोक आहेत, याची यादीही सरकारला सादर करण्यास सांगितली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवार, 13 मार्च रोजी होणार आहे.









