वृत्तसंस्था/ बुस्टो अॅर्सिजिओ (इटली)
येथे सुरू असलेल्या विश्व ऑलिम्पिक पात्र फेरीच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता मोहमद हुसामुद्दीनचे 57 किलो वजनगटात आव्हान संपुष्टात आले.
57 किलो वजन गटातील झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत आयर्लंडच्या ज्युडे गॅलेघरने हुसामुद्दीनचा 4-0 असा गुणफरकाने पराभव केला. या स्पर्धेत हुसामुद्दीनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. हुसामुद्दीनने विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी ही पहिली विश्व ऑलिम्पिक पात्र फेरीची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे 9 स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. आता 71 किलो वजनगटातील निशांत देव या एकमेव भारतीय मुष्टीयोद्ध्याचे आव्हान अद्याप जीवंत आहे. त्याचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी होणार आहे. पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताचे आतापर्यंत चार मुष्टीयोद्ध्यांनी आपली तिकीटे आरक्षीत केली आहेत. महिलांच्या विभागात 50 किलो गटात निखात झरीन, 54 किलो गटात प्रिती, 57 किलो गटात परवीन हुडा आणि 75 किलो गटात लवलिना बोर्गोहेन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली.









