ओव्हरब्रिजसाठी परीक्षण : शेतकऱ्यांतून नाराजी
बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिंगरोडचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी जाऊन सर्व्हे तसेच ड्रिलिंग मशिनच्या साहाय्याने माती व जमिनीतील परीक्षण करत आहेत. अगसगेजवळ शुक्रवारी ड्रिलिंग करण्यात येत होते. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. शेतकऱ्यांनी विरोध करूनही हा रोड करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्थगिती घेतली नाही त्यांच्या शेतामध्ये जाऊन ड्रिलिंग किंवा सर्व्हे करण्यात येत आहे. बेळगाव-अगसगे हा राज्य मार्ग आहे. त्यामुळे तेथे ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे. यासाठी प्रथम ड्रिलिंग केले जाते. माती परीक्षणासह जमिनीतील थरांचीही तपासणी केली जाते. शुक्रवारी ड्रिलिंगचे काम करण्यात येत होते. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी झाडांचा तसेच जमिनीचा सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे पुन्हा भीती पसरली आहे.









