सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह जलस्रोतांचा शोध
बेळगाव : बेळगाव शहरात पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या विहिरी, बोअरवेल यांना पुनरुज्जीवन करण्यासोबतच सांडपाण्यावर प्रक्रिया व तळ्यांमध्ये पाणी साठविणे यासाठी काम सुरू आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात पाणी कमी पडणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पाण्याची कमतरता भासू लागली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक जुन्या विहिरी व बोअरवेल आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यांचे पाणी वापरण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावने जय भारत फाऊंडेशनच्या माध्यमातून 1 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे सोमवारी उद्घाटन केले. यामुळे फिश मार्केट परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी स्वच्छतेसाठी, तसेच उद्यानांमध्ये वापरले जाणार आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाचणार आहे. त्यामुळे बोर्डनेही रोटरीच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात मुख्य पोस्ट ऑफिस रोडवर 35 हजार लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारला जाणार आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीत यापुढे बोअरवेल खोदाईसाठी परवानगीची सक्ती
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत यापुढे बोअरवेल खोदाई करण्यापूर्वी बोर्डची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. मध्यंतरी परवानगी न घेता नागरिकांनी प्रचंड प्रमाणात बोअरवेल मारल्याने बेसुमार पाण्याचा उपसा सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सीईओ राजीव कुमार यांनी नवी नियमावली जाहीर केली. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डची पूर्वपरवानगी घेऊनच बोअरवेल खोदाई करावी लागणार आहे.
तलाव निर्मितीसाठी प्रयत्न
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी तीन पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासोबतच जुन्या विहिरी व बोअरवेलचे पुनरुज्जीवन केले जात आहे. याबरोबरच पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खुल्या जागांमध्ये तलाव खोदाई व कालवे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– राजीव कुमार (सीईओ, कॅन्टोन्मेंट बोर्ड)









