विद्यार्थ्याचे कृत्य :
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडातील ओटावा येथे चाकूने हल्ला झाला आहे. येथील एका घरात एका विद्यार्थ्याने चाकूने वार करत 6 जणांचा जीव घेतला आहे. श्रीलंकेच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:सोबत राहत असलेल्या 6 जणांची चाकूने वार करत हत्या केल्याचा आरोप आहे. मृतांमध्ये श्रीलंकन कुटुंबाच्या 4 मुलांचा समावेश असल्याची माहिती ओटावा पोलिसांनी दिली आहे.
संशयिताकडून धारदार अस्त्राचा वापर करण्यात आला होता. आरोपीचे नाव फेब्रियो डी-जोयसा असून त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व मृत हे श्रीलंकेचे नागरिक असून ते अलिकडेच कॅनडात दाखल झाले होते. मृतांमध्ये 35 वर्षीय महिला, तिचा 7 वर्षीय मुलगा, 4 वर्षीय अन् 2 वर्षीय मुलगी आणि अडीच महिन्यांची मुलगी सामील असल्याचे ओटावा पोलीस प्रमुख एरिक स्टब्स यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या भयानक हिंसेमुळे आम्हाला धक्का बसला असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे. ओटावाचे महापौर मार्क सटक्लिफ यांनी या घटनेमुळे शहराच्या सर्व रहिवाशांची चिंता वाढल्याचे वक्तव्य केले आहे.









