वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील 9 सदस्यांच्या घटनापीठात सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ज्युडिथ प्रकाश यांचाही सांकेतिक समावेश करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी घडली. न्या, ज्युडिथ प्रकाश या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतभेटीवर आल्या आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहण्यासाठी त्यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनाही घटनापीठात समावून घेण्यात आले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचा परिचय आपल्या सहकाऱ्यांना करुन दिला. न्या. प्रकाश या भारतात ‘दिल्ली लवाद सप्ताह’ या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आल्या आहेत. त्यांचा भारताच्या घटनापीठातील समावेश सांकेतिक आहे. हे नऊ सदस्यांचे घटनापीठ आहे. केंद्र सरकार खनिज उत्खनन अनुमतीपत्र देताना जे मानधन (रॉयल्टी) घेते, त्याला कर मानले जावे का, हा मुद्दा सध्या या घटनापीठाच्या विचाराधीन आहे. 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्याच सात सदस्यांच्या घटनापीठाने मानधन हा करच मानला पाहिजे, असा निर्णय दिला होता. या निर्णयाला मोठ्या घटनापीठासमोर आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची सुनवणी 9 सदस्यांच्या घटनापीठासमोर होत आहे.
विधीज्ञांकडूनही स्वागत
सिंगापूरच्या न्यायाधीश ज्युडिथ प्रकाश यांचे सर्वोच्च न्यायालयात वकील संघटनेकडूनही स्वागत करण्यात आले. भारताचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्या. प्रकाश यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले. तर घटनापीठासमोरील प्रकरणात युक्तीवाद करणारे ज्येष्ठ विधीज्ञ हरीष साळवे यांनीही त्यांचे स्वागत केले.
अशी प्रथा पूर्वीपासून
अन्य देशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांमध्ये सांकेतिक स्थान देण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. असे विदेशातील न्यायाधीश घटनापीठात समाविष्ट असले तरी ते प्रत्यक्ष सुनावणीत भाग घेत नाहीत. किंवा निर्णयपत्र लिहिण्यातही त्यांचा सहभाग नसतो. तसेच त्यांचा समावेश केवळ एक-दोन दिवसांसाठीच असतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जेव्हा विदेशी न्यायाधीश भेट देतात तेव्हा त्यांचा असा सांकेतिक समावेश केला जातो. ही विदेशी न्यायाधीशांचा सन्मान करण्याची एक औपचारिक पद्धत आहे.









