कृषी महिला सबलीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन
बेळगाव : कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. जिल्हा पंचायत, बागायत खाते, एनआरएलएम विभाग व जिविका यांच्या सहयोगाने कृषी महिला सबलीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करून मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बेळगाव, खानापूर, बैलहोंगल तालुक्यातील बागायत खात्याअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिला उपस्थित होत्या. तीन तालुक्यांमध्ये 2500 हून अधिक महिलांना बागायत खात्याअंतर्गत बागायत पिके घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. माती परीक्षण, गांडूळ खत निर्मिती, उत्पादित पिकांची विक्री, पॅकिंग आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती बागायत खात्याच्या अधिकारी श्रीदेवी यांनी दिली. यावेळी चिराग जैन, जिवा अॅग्रोचे सूर्यम आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले अनुभव सांगितले.









