ऐन उन्हाळ्यातच पाण्याची समस्या बनली गंभीर : पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ
बेळगाव : आनंदनगर वडगावसह समृद्धी कॉलनीमधील विहिरींना ड्रेनेज मिश्रित पाणी आल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणी टंचाईच्यावेळीच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच तीन दिवस पाणीच आले नाही. त्यामुळे आणखी समस्या बिकट झाली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आनंदनगर पहिला, दुसरा आणि तिसरा क्रॉस या परिसरातही सर्वच विहिरींना ड्रेनेजचे पाणी मिश्रित झाले आहे. त्यामुळे त्या विहिरींचे पाणी उपसा करावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यातच ही परिस्थिती झाल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने ड्रेनेजचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. आनंदनगरपासून येळ्ळूर रस्त्यावरील गणेश मंदिरापर्यंत रस्ता व गटारीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ड्रेनेजचा चेंबर ब्लॉक होऊन साचून आहे. त्यामुळेच अनेक विहिरींमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी जात असल्याचे सांगण्यात आले. त्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा, याचबरोबर गटारींचे कामही पूर्ण करा, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ओमकारनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरात ड्रेनेजचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. तेव्हा आनंदनगरसह या परिसरातील रस्ते व गटारीचे काम तातडीने पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









