फ्रेंच ओपन बॅडमिंटन : अश्विनी-तनिशा पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले मलेशियन जोडीवर त्यांनी संघर्षपूर्ण विजय मिळविला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे.
सात्विक-चिराग यांना अग्रामानांकन असून यापूर्वी 2022 मध्ये येथे जेतेपद पटकावले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या या जोडीने येथील स्पर्धेची शानदार सुरुवात करताना जागतिक 12 व्या मानांकित आँग यू सिन व तेओ ई यी यांच्यावर 21-13, 24-22 अशी 47 मिनिटांच्या खेळात मात केली. सात्विक-चिराग यांनी मागील आठपैकी पाचव्यांदा मलेशियन जोडीवर विजय मिळविला आहे. मागील तीन स्पर्धांमध्ये सात्विक-चिराग यांनी उपविजेतेपद मिळविले होते. यावेळी ही कोंडी फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांची पुढील लढत मलेशियाच्या मॅन वेई चाँग व काइ वुन टी या जोडीशी होईल.
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य मिळविणाऱ्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यांनी आपल्याच देशाच्या अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो यांच्यावर 16-21, 21-19, 21-17 अशी मात केली. भारताच्या दोन जोड्या ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी धडपड करीत असून ऑलिम्पिक गेम्स पात्रता मानांकनात तनिशा-अश्विनी यांना 11 वे मानांकन आहे तर त्रीसा-गायत्री 14 व्या क्रमांकावर आहेत. त्रीसा-गायत्री जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या महिन्यात झालेल्या बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला जेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली होती.









