बेकारीचे प्रमाण घटले, अर्थव्यवस्था सुधारल्याचा परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात बेरोजगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. 2022 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 3.6 टक्के होते. ते 2023 च्या अखेरीस 3.1 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. शहरांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण 5.9 टक्क्यांवरुन 5.2 टक्क्यांवर आले आहे. ग्रामीण भागातही बेरोजगारीत घट झाल्याचे दिसत आहे. रोजगारांचे प्रमाण या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बेरोजगारी कमी झाली असून आशादायक चित्र निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
जागतिक सर्वेक्षण संस्था मूडीजने भारताच्या विकास दराचे अनुमान 6.7 टक्क्यांवरुन वाढवून 7.7 टक्के केले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत भारताचा विकास दर 8 टक्क्यांहूनही अधिक होता. अर्थव्यवस्थेची चक्रे आता गतीमान होत आहेत, याचाच हा प्रत्यय आहे, असे तज्ञांचे मत आहे.
महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले
देशाच्या कर्मचारीवर्गात आता महिलांचे प्रमाण वाढत आहे. महिला श्रमशक्तीची कार्यक्षेत्रात भागीदारी आता 33 टक्क्यांवरुन 41 टक्क्यांवर पोहचली आहे. महिलांच्या बेरोजगारीतही घट होऊन ते प्रमाण आता 3 टक्क्यांवर आले आहे. शहरी भागातही महिला श्रमशक्तीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. उच्च पदांवर काम करणाऱ्या महिलांची संख्या गेल्या एक वर्षात त्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली असली तरी व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांचे प्रमाण गेल्या एक वर्षात वाढले आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही माहिती मंगळवारी प्रसिद्ध केली आहे.









