दुरुस्ती करण्यासाठी बेस्कॉम घेणार ब्रेक
बेळगाव : राज्यात वीज वितरण कंपन्यांची सर्व्हर सेवा दहा दिवसांसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद केली जाणार आहे. दि. 10 ते 19 मार्च दरम्यान सर्व्हरडाऊन केला जाणार असल्याची माहिती बेस्कॉमने सर्व वितरण कंपन्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे नवीन वीजमीटर घेण्यासोबतच इतर कामकाजाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तांत्रिक दुरुस्तीसाठी सर्व्हर बंद ठेवण्याची ही काही पहिली वेळ नाही. सहा महिन्यांतून एकदा तरी तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली सर्व्हर बंद केला जात आहे. अनेकवेळा सर्व्हरडाऊनमुळे हेस्कॉममधील अंतर्गत कामकाज पूर्णपणे ठप्प होते. नवीन वीजमीटर घेणे, नावामध्ये बदल, पेमेंट करणे या सर्वच सुविधा ठप्प होतात. दि. 10 ते 19 मार्च दरम्यान सर्व्हर बंद ठेवला जाणार आहे. 10 दिवस सर्व्हर बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सध्या वास्तुशांतीचे मुहूर्त असल्याने मीटर घेण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे सुरू आहेत. परंतु, सर्व्हरडाऊन झाल्यास मीटर मिळणार नसल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एकदाच तांत्रिक दुरुस्ती करून सर्व्हरची समस्या सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
बेळगावमध्ये इलेक्ट्रिक मीटरचा तुटवडा…
होळीपूर्वी नवीन घरांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धांदल सुरू असतानाच मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक मीटरचा तुटवडा शहरात जाणवू लागला आहे. मीटर मिळत नसल्याने ग्राहक व हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. इलेक्ट्रिक कंत्राटदारही वैतागले असून मीटर वेळच्यावेळी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.









