डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन : केएलईमध्ये जागतिक श्रवणदिन कार्यक्रम
बेळगाव : ग्रामीण भागातील जनता अद्यापही अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेली आहे. त्यामुळे आजारांवर उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. ऐकू न येणे आणि बोलू न येणे हे उपजत आजार आहेत. यावर वेळेत उपचार घेतल्यास आजार बरा होवू शकतो. यासाठी ऐकू न येणाऱ्या मुलांची वेळीच आरोग्य तपासणी करून शस्त्रचिकित्सा करावी, असे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व काहेरचे कुलगुरु डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले. जागतिक श्रवणदिनाच्या पार्श्वभूमीवर काहेर, जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालय आणि केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या कान, घसा आणि नाक विभागातर्फे दि. 4 मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते म्हणाले, बहिरेपणा आणि बोलता न येणे या आजारांविषयी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय तपासणी करून उपचार करून घ्यावेत. अज्ञान दूर करून पीडित मुलांचा उपचार करून घ्यावा. त्यांना स्वत:च्या पायावर उभारण्याचे सामर्थ्य केएलई रुग्णालयातर्फे देण्यात येत आहे. ऐकू न येणाऱ्या मुलांवर उपचार करून या आजारांपासून त्यांना मुक्त करण्यात येत आहे. काक्लिअर इम्प्लॉन्ट शस्त्रचिकित्सा करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.
सरकारच्या साहाय्यधन योजनेंतर्गत समाजातील गोर-गरीब नागरिकांच्या मुलांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आमच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक डॉ. कर्नल दयानंद म्हणाले, एकाच छताखाली विविध आजारांवर उपचार दिले जात आहेत. आर्थिकरित्या मागासलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरकारच्या मोफत योजना सुरू आहेत. या अंतर्गत आजारांवर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक श्रवण दिनानिमित्त दि. 4 ते दि. 9 मार्चपर्यंत मोफत तपासणी केली जात आहे. याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रुग्णालयाच्या इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मेटगुडमठ यांनी प्रास्ताविक केले. जेएनएमसीचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. आरीफ मालदार, डॉ. बी. पी. बेळलदवर, डॉ. विनिता मेटगुडमठ, डॉ. पी. के. हजारे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रीती शेट्टी यांच्यासह आदी उपस्थित होते. डॉ. शमा बेल्लद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन अंकले यांनी आभार मानले.









