10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत करणार पाळणूक
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजच्या पिढीला समजावे व त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यावर्षी 10 मार्च ते 8 एप्रिल या दरम्यान बलिदान मास आचरण्यात येणार आहे. बेळगाव परिसरात बलिदान मास पाळण्याबाबत शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाणार आहे. दगाफटका करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. औरंगजेबाने धर्मांतरासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. परंतु, शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही, हे ठासून सांगितल्यानंतर त्यांचे एक एक अवयव काढण्यात येत होते. हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण असणाऱ्या गुढी पाडव्यादिवशीच क्रूरकर्मा औरंगजेबाने शंभूराजांची निर्घृण हत्या केली. तसेच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतस्तत: विखुरण्यात आले. त्यामुळे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची अंत्ययात्राही काढता आली नाही. या बलिदानाचे हिंदू धर्मियांना स्मरण व्हावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास आचरला जातो. संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. तरुण मंडळी आपल्याला आवडती एखादी वस्तू अथवा पदार्थ वर्ज्य करून धर्मवीर बलिदान मास पाळतात. प्रत्येक गावामध्ये बलिदान मास पाळला जावा, यासाठी शिवप्रतिष्ठानच्यावतीने जागृती केली जात आहे.
8 एप्रिलला निघणार मूक पदयात्रा
बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मूक पदयात्रा काढली जाते. 8 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंत मूक पदयात्रा काढली जाते. त्यानंतर धर्मवीर संभाजी ज्वाला शांत केली जाते. अधिकाधिक तरुणांनी बलिदान मासामध्ये सहभाग घेऊन शंभूराजांच्या धर्मभक्तीला अभिवादन करावे, असे आवाहन कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, शहरप्रमुख अनंत चौगुले यांनी केले.









