बेळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने शेतकरी नेत्यांनाही तिकीट द्यावे. बेळगाव दौऱ्यावर येत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांनी दिली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नेहमीच आंदोलन करावे लागले आहे. आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला आहे. अनेकवेळा आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या त्यांची गांभीर्याने घेतली जात नाही. आंदोलन करणारा शेतकरी नेता लोकसभेमध्ये नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी नेत्यांना तिकीट देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय देण्यात आलेला नाही. दुष्काळ निवारण करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे भांडवल केले जात आहे. नुकताच बेंगळूर येथे कॅफेमध्ये स्फोट होऊन अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हे राज्य सरकारचे अपयश आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तर शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांनी केली.









