राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार : पक्षाकडून आदर होत नसल्याची व्यथा
वृत्तसंस्था/ कोलकाता
लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तापस रॉय यांनी पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तापस यांनी सोमवारी स्वत:चा निर्णय प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केला आहे. जानेवारी महिन्यात माझ्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते, त्यावेळी पक्षाने साथ दिली नसल्याचा आरोप तापस यांनी केला आहे.
पक्षात माझा आदर होत नसल्याचे जाणवू लागले होते, याचमुळे मी राजीनामा दिला आहे. ईडीचे पथक 12 जानेवारी रोजी माझ्या निवासस्थानी आले होते, यानंतर अनेक दिवस उलटून गेल्यावरही पक्षाकडून कुठलाच पाठिंबा किंवा सहानुभूती जाहीर करण्यात आली नाही. विधानसभा अध्यक्षांना माझा राजीनामा सोपविला आहे, आता मी स्वतंत्र असल्याचे तापस रॉय यांनी म्हटले आहे.
पुढील वाटचालीचा अद्याप निर्णय नाही
तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ भ्रष्टाचारच दिसून येतो. गुन्हा कुणी दुसराच करतो आणि त्याची शिक्षा भलत्यांनाच होते हे योग्य नाही. मी अनेक प्रकारच्या वादांना सामोरा जात होतो. तृणमूल काँग्रेसच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे मी निराश आहे. पक्ष आणि सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे व्यथित झालो आहे. याचदरम्यान बंगाल सरकारने संदेशखाली प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्याचे समर्थन करू शकत नसल्याचे उद्गार तापस यांनी काढले आहेत. पुढील वाटचालीसंबंधी अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
5 वेळा आमदार
तापस रॉय हे बंगालच्या बारानगरचे आमदार आहेत. ते 5 व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तापस बंगालमध्ये नियोजन आणि सांख्यिकी मंत्री होते. कोलकाता महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. तसेच ते विद्यार्थी नेते देखील राहिले होते.
कुणाल घोषही पक्षातून बाहेर
तृणमूल काँग्रेसला 3 दिवसांमध्ये हा दुसरा मोठा झटका आहे. यापूर्वी पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी 1 र्मर्च रोजी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. प्रवक्ता तसेच महासचिव पदावर राहण्याची इच्छा नाही. पक्षाच्या व्यवस्थेशी जुळवून घेणे अवघड ठरत असल्याचे घोष यांनी म्हटले होते.









