नवी दिल्ली :
डिजिटल देवाणघेवाणीच्या व्यवहारांना सध्याला प्राधान्य दिले जात असून या अंतर्गत नेफ्टच्या माध्यमातून एकाच दिवशी चार कोटी इतके विक्रमी व्यवहार झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवहारांमध्ये 700 टक्के वाढ नोंदविलेली आहे. 16 डिसेंबर 2019 रोजी नेफ्ट प्रणाली सुविधा 24 तास सुरू करण्यासंदर्भातली घोषणा करण्यात आली होती. डिसेंबर 2020 रोजी आरटीजीएस सिस्टीमसाठी ही सुविधा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. डिजिटल पेमेंट प्रणाली कार्यरत झाल्यापासून अनेकांना बँकांच्या रांगांमध्ये थांबण्याची गरज राहिली नसल्याचे दिसून आले आहे. व्यावसायिकांसह सामान्यही आजकाल डिजिटल माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करू लागला आहे.
कधी झाले विक्रमी व्यवहार
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर म्हणजेच नेफ्टच्या माध्यमातून 29 फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने व्यवहार झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी रोजी नेफ्टच्याअंतर्गत चार कोटी दहा लाख व्यवहार एकाच दिवशी झाले आहेत. एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. नव्या प्रणालीनुसार हे पैसे अर्ध्या तासात नेफ्टअंतर्गत दुसऱ्याच्या संबंधीताच्या खात्यावर जमा होतात.









