मुंबई इंडियन्सवर 7 गड्यांनी मात, सामनावीर किरण नवगिरचे आक्रमक अर्धशत, मॅथ्यूजचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सामनावीर किरण नवगिरेने नोंदवलेले जलद अर्धशतक आणि अॅलीसा हिलीसमवेत मुंबईच्या गोलंदाजांवर केलेला आक्रमक हल्ला यांच्या बळावर यूपी वॉरियर्स महिला संघाने महिला प्रिमियर लीगमधील या मोसमातील पहिला विजय नोंदवताना मुंबई इंडियन्स महिला संघावर 7 गड्यांनी मात केली.
नवगिरेने केवळ 31 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 57 धावा झोडपल्या तर हीलीने 29 चेंडूत 33 धावा फटकावल्या. मुंबई इंडियन्सच्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या दोघींनी 55 चेंडूतच 94 धावांची सलामीची भागीदारी करीत विजयाचा पाया रचला. यूपी वॉरियर्सच्या नंतरच्या फलंदाजांचे काम या भागीदारीमुळे सोपे झाले. 16.4 षटकांत 3 बाद 163 धावा जमवित त्यांनी विजय साकार केला. विद्यमान विजेत्या असलेल्या मुंबई इंडियन्स महिलांचा हा या मोसमातील पहिला पराभव आहे. फॉर्ममध्ये असलेली नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर किरकोळ दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकली नाही. तिच्या गैरहजेरीत सिव्हर ब्रंटने मुंबईचे नेतृत्व केले. हेली मॅथ्यूजने 47 चेंडूत 55 धावा जमविल्यामुळे प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मुंबई इंडियन्स महिलांनी 20 षटकांत 6 बाद 161 धावा जमविल्या.
नवगिरेची आक्रमक खेळी
मुंबईची ही धावसंख्या तशी बऱ्यापैकी आव्हानात्मक होती. पण नवगिरे व हीली यांनी आक्रमक हल्ला करीत मुंबईच्या गोलंदाजांना पूर्णत: निष्प्रभ केले. नवगिरे ही वरिष्ठांच्या टी-20 मध्ये डावात दीडशेहून अधिक धावा करणारी एकमेव भारतीय फलंदाज आहे. तिला बढती देत यूपीने सलामीला पाठविले आणि त्यांची ही चाल यशस्वी ठरली. जखमी शबनिम इस्माईलची उणीवही मुंबईला गोलंदाजीत जाणवली. हीली व नवगिरे यांनी प्रारंभापासूनच आक्रमण सुरू केले आणि हा जोम नंतरच्या फलंदाजांनीही पुढे चालू ठेवला. नवगिरेने प्रारंभी 6 चेंडूत 5 धावा जमविल्या. पण इसी वाँगने टाकलेल्या तिसऱ्या षटकात तिने चार चौकार ठोकत 16 धावा वसूल करीत आक्रमण सुरू केले. लेगस्पिनर अमेलिया केरच्या गोलंदाजीवर ती यष्टिचीत झाली. तिने 31 चेंडूच्या खेळीत 6 चौकार, 4 षटकार मारले. मॅकग्रा 1 धाव काढून बाद झाल्यानंतर ग्रेस हॅरिस व दीप्ती शर्मा यांनी चौथ्या गड्यासाठी 65 धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाचा विजय साकार केला. हॅरिस 17 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 38 व दीप्ती शर्मा 20 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 27 धावा फटकावल्या. मुंबईच्या इसी वाँगने 2, अमेलियाने 1 बळी मिळविला.
मुंबईच्या डावात यास्तिका भाटियाने 22 चेंडूत 26 धावा जमविताना मॅथ्यूजसमवेत 50 धावांची सलामी दिली. याशिवाय कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने 14 चेंडूत 19, अमेलिया केरने 16 चेंडूत 23, पूजा वस्त्रकारने 12 चेंडूत 18, इसी वाँगने 6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 15, साजनने 4 धावा जमविल्या. अंजली सरवानी, हॅरिस, एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, गायकवाड यांनी एकेक बळी मिळविले.
आज गुरुवारी आरसीबी महिला व दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यात सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स महिला 20 षटकांत 6 बाद 161 : मॅथ्यूज 47 चेंडूत 55, भाटिया 22 चेंडूत 26, सिव्हर ब्रंट 14 चेंडूत 19, अमेलिया 16 चेंडूत 23, पूजा 12 चेंडूत 18, वाँग 6 चेंडूत नाबाद 15, सजना 4, सरवानी, हॅरिस, एक्लेस्टोन, दीप्ती, गायकवाड प्रत्येकी 1 बळी.









