वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 37 वर्षीय वॅग्नरने 64 कसोटीत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या वॅग्नरने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले. तो न्यूझीलंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 37 धावांच्या सरासरीने 260 बळी मिळविले आहे. येत्या गुरुवारपासून वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी न्यूझीलंड संघामध्ये आता वॅग्नरचा समावेश केला जाणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वॅग्नरने 2012 साली कसोटी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते. तब्बल 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये वॅग्नरने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला बऱ्याच सामन्यात विजय मिळवून दिला आहे. 2022 साली झालेल्या आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद न्यूझीलंडने मिळविले होते. या यशामध्ये वॅग्नरचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. 2008 साली वॅग्नर दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला होता. वॅग्नरच्या कसोटी कारकिर्दीतील 64 सामन्यांपैकी 34 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. गेल्या वर्षी वेलिंग्टनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळविला होता. या सामन्यात वॅग्नरने 62 धावांत 4 गडी बाद केले होते. वॅग्नरने इंग्लंडचा शेवटचा फलंदाज अँडरसनला बाद केल्याने इंग्लंडला हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. क्रिकेट न्यूझीलंडने तसेच प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी वॅग्नरच्या कामगिरीचे कौतुक करुन त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.









