वृत्तसंस्था/ रांची
धर्मशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या भारताविऊद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे सदस्य चंदिगड आणि बेंगळूरमध्ये एक आठवड्याची विश्रांती घालवणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान जी दीर्घ विश्रांती मिळाली होती त्याचा लाभ उठवत संपूर्ण इंग्लंड संघाने अबुधाबीमध्ये आपला मोकळा वेळ घालवला होता. .
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने 25 जानेवारीपासून सुरू झालेल्या मालिकेसाठी भारतात येण्यापूर्वी देखील अबुधाबीमध्ये सराव केला होता. तथापि, आता पाहुण्या संघातील खेळाडूंनी धर्मशाला कसोटीच्या आधी आठवडाभराचा कालावधी घालवण्यासाठी चंदिगड आणि बेंगळूरची निवड केली आहे. पाचव्या कसोटीपूर्वीचा कालावधी चंदिगड व बेंगळूरमध्ये संघ घालवेल. या ब्रेकदरम्यान ते जाळ्यात सराव करण्याची शक्यता नाही. अंतिम कसोटीच्या (4 मार्चपासून) तीन दिवस आधी संघ धर्मशाला येथे पोहोचेल, असे ईसीबीच्या सूत्रांनी सांगितले. भारताविऊद्धचा पराभव हा पाहुण्यांचा त्यांच्या ‘बाझबॉल’ युगातील पहिला मालिका पराभव आहे.









