कविरप्पा : 6 बळी, विशाख विजयकुमार : 4 बळी
वृत्तसंस्था/ नागपूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कविरप्पा आणि विशाख विजयकुमार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कर्नाटकाने विदर्भला दुसऱ्या डावात 196 धावात रोखले. त्यामुळे या सामन्यात विदर्भकडून कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 371 धावांचे आव्हान मिळाले. सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकाने दुसऱ्या डावात 1 बाद 103 धावा जमविल्या होत्या. अगरवाल 61 धावांवर खेळत होता. मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 268 धावांची जरूरी असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.
या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 460 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर कर्नाटकाचा पहिला डाव 286 धावांत आटोपला. विदर्भने कर्नाटकावर पहिल्या डावात 174 धावांची भक्कम आघाडी मिळविली. विदर्भने सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला बिनबाद 50 या धावसंख्येवरून प्रारंभ केला. पण त्यांचा दुसरा डाव 196 धावांत आटोपला. विदर्भच्या दुसऱ्या डावात ध्रुव शोरेने 58 चेंडूत 3 चौकारांसह 57 तर करूण नायरने 37 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे कविरप्पाने 61 धावात 6 तर विशाख विजयकुमारने 81 धावात 4 गडी बाद केले. कर्नाटकाला विजयासाठी 371 धावांचे आव्हान विदर्भने दिले. कर्नाटकाने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. रविकुमार समर्थ आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागिदारी केली. खेळ संपण्यापूर्वी समर्थ सरवटेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 40 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ प. डाव 460, कर्नाटक प. डाव 286, विदर्भ दु. डाव 57.2 षटकात सर्वबाद 186 (शोरे 57, नायर 34, कविरप्पा 6-61, विजयकुमार 4-81), कर्नाटक दु. डाव 26 षटकात 1 बाद 103 (मयांक अगरवाल खेळत आहे 61, समर्थ 40, सरवटे 1 बळी).









