अध्याय एकतिसावा
नाथमहाराज म्हणाले, श्रीकृष्णनाथांच्या वैकुंठगमन सोहोळ्याला हजर असलेल्या देवांना असा गर्व झालेला होता की, आम्ही मायेचे नियंते आहोत. त्यामुळे माया आमचे काहीही वाकडे करू शकत नाही उलट तीच आमच्या नजरेखाली काम करते. आम्हाला सर्व परिस्थितीची जाणीव असून सकळ भूत, भविष्य जाणणारे आम्ही सर्वज्ञ आहोत. देवांना झालेला गर्व भगवंतांनी जाणलेला होता. नाहीतरी कुणाच्या मनात काय चाललेले आहे हे भगवंतांपासून कधीच लपून रहात नाही. त्या सगळ्यांचे गर्वहरण करण्यासाठी श्रीहरी अचानक वैकुंठाला निघून गेले. श्रीहरी आपल्याला धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीने वैकुंठाला गेले हे पाहिल्यावर देवांना लाजल्यासारखे झाले. श्रीकृष्णांची वैकुंठगमनाची गती महादेवांच्यासह कुणाच्याही समजुतीच्या पलीकडे असल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. देवगण असे आश्चर्यात पडले असतानाच सत्य-धर्म-श्री-धृति-कीर्ती ही सर्व भगवंतांच्या बरोबर कायम राहणारी मंडळी कुणाचीही पर्वा न करता श्रीकृष्णनाथांच्याबरोबर राहण्यासाठी निघाली. इंद्र बृहस्पती मुख्यत्वे ब्रह्मा इत्यादि सर्व देवांना भ्रमात पाडून श्रीकृष्णनाथांनी निजधामात प्रवेश केला. खरोखरंच त्यांचा महिमा अतर्क्य आहे.
स्वत:च्या गतीचा, शक्तीचा देवांना बिलकुल अंदाज न येऊ देता त्यांनी निजधामाकडे गमन केले होते. ह्या सगळ्या प्रकाराने चकित झालेले देवगण स्वधामाकडे जाताना घडीघडी आश्चर्य व्यक्त करत होते. म्हणत होते, श्रीकृष्णनाथांच्या मनातली गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही. आम्हालाच काय शिव आदि देवांच्यासुद्धा असं काही घडेल असं लक्षात आलं नाही. पुढील दृष्टांत देऊन परीक्षित राजाला ही बाब समजावून सांगताना शुकमुनी म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात चमकणारी वीज कोठून आली आणि कुठे गेली हे पृथ्वीवरील माणसांपैकी कुणीच सांगू शकत नाहीत. त्याप्रमाणे श्रीकृष्ण केव्हा आणि कसे गुप्त झाले हे देवादिकही सांगू शकले नाहीत. खरं म्हणजे श्रीकृष्णांना इथून तिकडे जाणे किंवा तिथून अन्य कुणीकडे जाणे असे करण्याची काहीच गरज नव्हती कारण ते तर सदैव परिपूर्ण ब्रह्म असल्याने सर्वत्र व्यापून होते. आकाशाला जर घर द्यायचं झालं तर कोणत्याही घरात ते मावू शकणार नाही कारण ते यत्रतत्र सर्वत्र सारख्या प्रमाणात हजर असते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र हजर असतात. त्यामुळे ते येथे नाहीत. तेथे गेले किंवा तेथून येथे आले, ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. फक्त देवादिकांच्या ही बाब त्यांना स्वत:च्या कर्तृत्वाचा आणि सर्वज्ञ असल्याचा गर्व झाला असल्याने लक्षात आली नव्हती. त्यामुळे ते श्रीकृष्णनाथ येथून जातील, जाताना आपल्या घरी येतील, येताना त्यांनी वैकुंठातील आणलेल्या संपत्तीतील काही भाग आपल्याला देतील इत्यादी कल्पना लढवत बसले होते. तेव्हढ्यात परमाद्भुत महिमा असलेले भगवंत निजधामाला निघून गेले. त्यामुळे आम्ही मायानियंते निजशक्ती असून आम्ही दुर्गम योगगती जाणतो हा देवगणांना झालेला अभिमान मात्र गळून पडला. अभिमान गळून पडल्याने देवगण अत्यंत विनम्र झाले. त्यांनी श्रीकृष्णनाथांची स्तुती करायला सुरवात केली. रुद्र पंचमुखाने स्तुती करू लागले तर ब्रह्मदेवांनी चारही मुखांनी स्तुती करायला सुरवात केली. आश्चर्यचकित झालेल्या देवांना श्रीकृष्णाची कितीही स्तुती केली तरी श्रीकृष्णाचा महिमा अगाध असल्याने देवांना मुळीच समाधान वाटेना. पूर्वी अनेकदा सांगितलेले श्रीकृष्ण महात्म्य शुकमुनी परीक्षित राजाला पुन्हा सांगू लागले. श्रीकृष्णाच्या महात्म्याची एकदा गोडी लागली की, मनुष्य वारंवार ते ऐकण्यासाठी उत्सुक असतो. राजा परीक्षितही त्याला अपवाद नसल्याने तोही ते ऐकण्यासाठी सरसावून बसला.
क्रमश:








