बसुर्तेमधील शेतवडीत लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या-खराब खांब बदलण्याची शेतकऱ्यांच्या निवेदनाची हेस्कॉमकडून दखल
वार्ताहर /उचगाव
बसुर्ते परिसरातील गेल्या बऱ्याच वर्षापासून लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिन्या व खराब झालेले विद्युतखांब बदलण्यात यावेत, अशी अनेक वर्षांपासून शेतकरी व ग्रामस्थांची मागणी होती. त्याची दखल घेऊन उचगाव हेस्कॉम विभागाचे प्रमुख सचिन यांनी गेल्या आठ दिवसापासून बसुर्ते शेतवडीत व परिसरामध्ये खराब झालेले विद्युतखांब व वीजवाहिन्या बदलण्याचे काम सुरू केलेले आहे. संपूर्ण शेतवडीमध्ये खराब झालेल्या वीजवाहिन्या व खांब होते. ते काढण्यात आलेले असून त्या ठिकाणी 66 नवीन खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून खराब झालेल्या विद्युत वाहिन्या व खांब बदलण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन व तक्रार बसुर्ते गावातील शेतकरी व नागरिकांकडून देण्यात आले होते. परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. उचगाव हेस्कॉम विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन यांनी तात्काळ याची दखल घेऊन संपूर्ण बसुर्ते शेतवडीची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी अत्यावश्यक आहे, असे खांब तात्काळ बदलण्यात आलेले आहेत. व संपूर्ण नवीन विद्युत वाहिन्या घालण्यात येत आहेत. त्यामुळे बसुर्ते गावच्या शेतवडीतून जाणाऱ्या ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा अन्य वाहनांना यापुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. किंवा विद्युततारांचा स्पर्श होऊन कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
66 वीजखांब मंजूर
जवळजवळ संपूर्ण शेतवडीची पाहणी झाल्यानंतर त्या ठिकाणी 66 खांब मंजूर करून बसवण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण विद्युत वाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन वीजवाहिन्या जोडण्यात येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना यापुढे शेतवडीमध्ये जाताना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. तात्काळ काम सुरू केल्याने शेतकरी व नागरिकांनी हेस्कॉम अधिकारी सचिन यांचे आभार मानले आहेत. हे काम एक-दोन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.
यापुढे दुर्घटना घडणार नाहीत!
अनेक वर्षापासून बसुर्ते गावातील शेतकऱ्यांचे खराब झालेले विद्युतखांब वाहिन्या बदलण्याची मागणी होती व अनेकवेळा विद्युत वाहिनी तुटून दुर्घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे मी स्वत: जाऊन संपूर्ण जागेची पाहणी करून अत्यावश्यक ठिकाणी नवीन खांब व नवीन विद्युत वाहिनी जोडण्याचे काम सुरू केले आहे. संपूर्ण आराखडा तयार करून खात्यामार्फत 66 विद्युतखांब मंजूर करून घेण्यात आलेले आहेत.त्यामुळे यापुढे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
– सचिन, हेस्कॉम अधिकारी उचगाव विभाग.









