वृत्तसंस्था/ रूरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या प्रो लिग पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत शनिवारी यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यात आपल्या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्न करेल.
भारतीय हॉकी संघाला यापूर्वीच्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात टॉप सिडेड नेदरलँड्सकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-4 अशा गोलफरकाने पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात भारतीय हॉकी संघ आपले स्थान सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत सध्या सहा सामन्यातून 11 गुणासह चौथ्या स्थानावर आहे तर बलाढ्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना न गमवता विजयी घोडदौड कायम राखली असून त्यांनी आपले सर्व म्हणजे सहा सामने निर्णायक जिंकून आघाडीचे स्थान पटकावले आहे. भुवनेश्वरमध्ये अलीकडेच झालेल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6-4 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या सामन्यात भारताने सुरुवातीला दोन गोलांची आघाडी मिळवली होती. हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ शनिवारच्या सामन्यात सांघिक कामगिरीवर अधिक भर देऊन मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्न करेल. हरमनप्रित सिंग, जुगराज सिंग आणि अमित रोहीदास यांना नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही. या स्पर्धेत भारताचा त्यानंतरचा सामना रविवारी आयर्लंड बरोबर होणार आहे.









