वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी हवाई दलाच्या तोतया विंग कमांडरला अटक केली आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे पालम एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर तो तोतया असल्याचे उघड झाले आहे. विनायक चड्ढा (वय 39 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो मलकागंज येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे पाच बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. आपल्याला एअरफोर्स डेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असल्यामुळे बनावट ओळखपत्राच्या आधारे तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. हवाई दल आणि दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. झडतीनंतर आरोपीकडून भारतीय हवाई दलाशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.









