वृत्तसंस्था /जंजगीर
भारताला एक बलाढ्या आणि विकासीत देश म्हणून ओळख मिळवून देण्याचे भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही या ध्येयाच्या पूर्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहोत. ही प्रक्रिया पुढेही होत राहण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना पूर्ण बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ते छत्तीसगमधील जंजगीर येथे एका जाहीर सभेत बोलत होते. या राज्यात नुकतीच भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविलेली आहे. गेली पाच वर्षे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे राज्य होते. तथापि, ते अत्यंत अकार्यक्षम असल्याने नक्षली हिंसाचारावर नियंत्रण मिळविण्यास ते सपशेल अपयशी ठरले होते. काँग्रेसच्या राज्यात छत्तीसगडमध्ये अनागोंदी कमालीची वाढली होती. त्यामुळे निरपराध लोकांचे शोषण केले जात होते. प्रशासनावरही त्या सरकारचा कोणताही वचक नव्हता. परिणामी, राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत पुन्हा भारतीय जनता पक्षालाच मोठा कौल दिला. आता लोकसभेच्या निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षालाच सर्व 11 जागांवर विजयी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला आपला पूर्ण पाठिंबा देईल, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.









