इस्टोनियावर 4-3 ने मात,मनीषाचे दोन गोल
वृत्तसंस्था/ अलान्या, तुर्की
तुर्कीश महिला चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी इस्टोनियावर संघर्षपूर्ण लढतीत 4-3 अशा गोलफरकाने विजय मिळविला. युरोपियन संघाविरुद्ध मिळविलेला हा भारतीय महिलांचा पहिलाच विजय आहे.
स्ट्रायकर मनीषा कल्याणने दोन गोल नोंदवले. छाओबा देवी यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारताने युफा कॉन्फेडरेशनमधील संघाला प्रथमच हरवून नवा इतिहास घडविला. मध्यंतराला दोन्ही संघांत 1-1 अशी बरोबरी झाली होती. मनीषाने 17 व 81 व्या मिनिटाला तर इंदुमती कथिरेसनने 62 व प्यारी झाझाने 79 व्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले. लिसेटी तमिक (32 वे मिनिट), व्लाडा कुबासोव्हा (88 वे मिनिट) व मेरी लिस लिलेमइ (90 वे मिनिट) यांनी इस्टोनियाचे गोल केले.
येथील गोल्ड सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी शानदार सुरुवात करताना मनीषाने नोंदवलेल्या गोलवर आघाडी घेतली. लिसेटी तमिकने इस्टोनियाला 32 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिल्यानंतर भारताने तीन गोल नोंदवून 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली. इंदुमती, प्यारी झाझा व मनीषा यांनी हे गोल केले. भारतीय संघ मोठा विजय मिळविणार असे वाटत असतानाच इस्टोनियाने अखेरच्या टप्प्यात बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. 88 व्या मिनिटाला कुबासोव्हाने तर अखेरच्या मिनिटाला लिलेमइने गोल नोंदवले. पण भारताला विजयापासून ते रोखू शकले नाहीत.









